कंपनीकडून यापूर्वी १२५० कर्मचाऱ्यांची कपात, कंपनीकडून डाऊन साईजिंगचे धोरण कायम!
प्रतिनिधी: एकीकडे भारतात सेमीकंडक्टर चीप बनवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक जागतिक कंपन्यांना गुंतवणूकीसाठी आमंत्रण देत आहेत.अनेक कंपन्यांनी भारतात गुंतवणूक करण्यास हिरवा कंदीलही दाखवला होता.परंतु दुसरीकडे अमेरिकेतील स्मार्टफोन बाजारातील दुःखद बातमी समोर आली आहे. क्वालकॉम (Qualcomm) या स्मार्टफोनमध्ये वापरण्यात येणाऱ्या चीप कंपनीने २२६ कर्मचाऱ्यांना निलंबित करत कर्मचारी कपात करण्याचे ठरवले आहे. यावर्षीच्या शेवटी ही कर्मचारी कपात करणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.अमेरिकेतील सेन डिएगो येथील कंपनीतून ही कारवाई होणार आहे.
कंपनीच्या सायबर सिक्युरिटी विभागातील १६ ठिकाणच्या कर्मचाऱ्यांना हा नारळ देण्यात येणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. याविषयी बोलताना क्वालकॉम कंपनीचे प्रवक्ते म्हणाले, ‘आमच्या आघाडीच्या तंत्रज्ञान आणि उत्पादन पोर्टफोलिओने आम्हाला आमच्या विविधीकरणाच्या धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी स्थान दिले आहे.व्यवसायाच्या सामान्य वाटचालीचा एक भाग म्हणून, आम्ही आमच्या गुंतवणुकी, संसाधने आणि प्रतिभा यांना प्राधान्य देतो आणि संरेखित करतो जेणेकरून आमच्यासमोर असलेल्या अभूतपूर्व विविधीकरणाच्या संधींचा लाभ घेण्यासाठी आम्ही चांगल्या स्थितीत आहोत’ असे म्हटले आहे. मात्र कर्मचारी कपातीचे कारण अजून समोर आले नसुन या कपातीमुळे कंपनीच्या कामकाजात काय परिणाम होणार आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
मागच्या वर्षी कंपनीने १२५० कर्मचाऱ्यांना नारळ दिला होता. २०२३ या आर्थिक वर्षात कंपनीला ३५.८ अब्ज डॉलर्सचा महसूल मिळाला होता. गेल्या काही वर्षांत तंत्रज्ञान उद्योगात मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात होण्याचे प्रमाण वाढलेले आहे. यापूर्वी मायक्रोसॉफ्टनेदेखील ६५० कर्मचाऱ्यांची कपात केली होती. तर सिस्को कंपनीने ४००० हून अधिक कर्मचाऱ्यांची कपात केली होती.
