भाजपचे धक्कातंत्र: फडणवीसांचा दिग्गज नेत्यांना मंत्रिमंडळातून डच्चू | BJP | ShivSena | NCP

1 year ago 0 7

महायुती सरकारमधील मंत्र्यांचा शपथविधी सोहळा रविवारी संध्याकाळी पार पडला असून यामध्ये भाजप, शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांकडून एकूण ३९ मंत्र्यांनी शपथ घेतली. यामध्ये भाजपच्या १९, शिवसेनेच्या ११ तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या ९ मंत्र्यांनी शपथ घेतली.


या मंत्रिमंडळात तिन्ही पक्षांतील अनेक दिग्गज नेत्यांचा पत्ता कट झाल्याचं पहायला मिळतंय. भाजपमध्ये सुधीर मुनगंटीवार, रविंद्र चव्हाण, शिंदेंच्या शिवसेनेतून दीपक केसरकर, अब्दुल सत्तार, तानाजी सावंत तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून दिलीप वळसे पाटील, अनिल पाटील, छगन भुजबळ अशा नेत्यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आल्याचं पहायला मिळतंय.


भाजपने दिग्गज नेत्यांना डच्चू दिला असून रवींद्र चव्हाण यांची आता लवकरच प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती होणार असल्याचे उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले. चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, मंगलप्रभात लोढा, राधाकृष्ण विखे-पाटील, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई अध्यक्ष अॅड. आशिष शेलार आदि ज्येष्ठ नेत्यांचा मंत्रिमंडळात समावेश करून समन्वय राखण्याचा प्रयत्न केला आहे.


भाजपने नवीन चेहऱ्यांना संधी देताना काही ज्येष्ठ मंत्र्यांना वगळलय. चव्हाण हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासातील नेते असून त्यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी होती. बावनकुळे यांची प्रदेशाध्यक्ष पदाची मुदत ऑगस्ट २०२५ पर्यंत असली तरी त्यांना मंत्रीपद देण्यात आल्याने ‘एक व्यक्ती, एक पद’ या न्यायाने प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी अन्य ज्येष्ठ नेत्याकडे दिली जाईल हे स्पष्ट होतय.
जाणून घेऊयात मुनगंटीवारांना वगळण्याचं मोठं कारण काय असेल..

अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांना भाजपमध्ये प्रवेश देऊन चंद्रपूरमधून उमेदवारी देण्यास मुनगंटीवार यांनी जाहीरपणे विरोध केला होता. त्यांच्याऐवजी भाजपमधील नेत्याला उमेदवारी देण्याची त्यांची मागणी होती. त्यासाठी मुनगंटीवार यांनी दिल्लीला जाऊन वरिष्ठ नेत्यांना विनंतीही केली होती. पण त्यांचा विरोध डावलून फडणवीस यांनी जोरगेवार यांना उमेदवारी दिली आणि ते निवडून आले. जोरगेवार यांच्या उमेदवारीनिमित्ताने फडणवीस आणि पक्षश्रेष्ठींच्या निर्णयास केलेला विरोध मुनगंटीवार यांना महागात पडल्याचे बोलले जात आहे


आता राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील काही महिन्यांमध्ये होण्याची शक्यता असल्याने नवीन प्रदेशाध्यक्षांची नियुक्ती लवकरच केली जाण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे. भाजपचे प्रदेश अधिवेशन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत १२ जानेवारी रोजी शिर्डीत होणार असून त्यात चव्हाण यांची निवड केली जाण्याची शक्यता असल्याचे सूत्रांकडून कळतय.

Leave a Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *