मतदान चोरीचे पाप लपवण्यासाठीच केंद्रातील भाजपा सरकारचा नवीन कायदा.
भाजपा युतीकडून लाडक्या बहिणींचा विश्वासघात, सरसकट सर्व बहिणींना २१०० रुपये द्या.
मुंबई, दि. १४ जानेवारी २०२५ : राज्यातील बीड व परभणी मधल्या घटना भाजपा युती सरकार पुरस्कृत असून सत्ताधारी पक्षाचे आमदार सरकार कडूनच माहिती घेऊन ती जाहीरपणे सांगत आहेत. भाजपा युती सरकार खेळ करत मुख्य आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. सरकारने हा खेळ थांबवावा व बीड घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
भंडारा येथे प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पुढे म्हणाले की, बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली आहे. महाराष्ट्रात अशा प्रकारची घटना पुन्हा घडू नये यासाठी या घटनेतील आरोपींना कठोर शिक्षाच झाली पाहिजे. बीड व परभणीच्या घटनेने महाष्ट्राच्या प्रतिमेला काळिमा फासला गेला आहे. दोन्ही घटनांवर भाजपा युती सरकारचा जो तमाशा सुरु आहे, त्याबद्दल महाराष्ट्राची जनता भाजपा सरकारला माफ करणार नाही.
मतदान चोरीचे पाप लपवण्यासाठी नवा कायदा…
विधानभा निवडणुकीत निवडणूक आयोगाने पाप केले आहे. रात्रीच्या अंधारात ७६ लाख मते वाढली कशी? याचे समाधानकारक उत्तर निवडणूक आयोग देऊ शकले नाही. मतदानाच्या दिवशी संध्याकाळी ६ वाजल्यानंतर मतदारांच्या रांगा असल्याचे व्हिडीओ दाखवावेत अशी मागणी काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाकडे केली होती पण आयोगाने ते पुरावे दिलेच नाहीत. तर विधानसभेत राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी निवडणूक आयोगाची वकिली केली. मतदान चोरीचे पाप लपवण्यासाठी केंद्र सरकारने आता कायदा केला आहे, या नव्या कायद्यानुसार निवडणूक आयोग कोणतीही माहिती देत नाही. मतांवर दरोडा घालण्याचे काम भाजपा व निवडणूक आयोगाने केले आहे. मतांची चोरी करून सरकार आल्याने जनता या सरकारला आपले सरकार मानत नाही, असे पटोले म्हणाले.
भाजपा युतीकडून लाडक्या बहिणींचा विश्वासघात…
विधानभा निवडणुकीत माता भगिनींची मते घेण्यासाठी लाडकी बहिण योजना सुरु करून सरसकट सर्व भगिनींना दीड हजार रुपये दिले आता या सरकार स्थापन झाल्याने भाजपाला बहिणींची गरज राहिलेली नाही म्हणूनच बहिणींना धमक्या देऊन पैसे परत घेण्याची भाषा केली जात आहे हा विश्वासघात आहे. भाजप युती सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करत सरसकट सर्व बहिणींना दरमहा २१०० रुपये द्यावेत, असेही नाना पटोले म्हणाले.