शिवडीत बाळा नांदगावकर यांना भाजपचे समर्थन

1 year ago 0 6

आशिष शेलार; पूर्ण ताकदीने काम करण्याचे कार्यकर्त्यांना आवाहन

मुंबई : शिवडी विधानसभा मतदारसंघात मनसे नेते बाळा नांदगावकर यांना समर्थन देण्याची घोषणा मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार ऍड. आशिष शेलार यांनी मंगळवार, दि. ५ नोव्हेंबर रोजी केली. हे समर्थन केवळ शिवडीपुरते असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

शिवडी येथे आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. आमदार शेलार म्हणाले, ज्या अपक्षाने भाजपाचा उल्लेख केला त्याला आमचे समर्थन नाही. कारण कुठलाही संवाद, चर्चा न करता, थेट अर्ज भरण्यात आला. मग दोघेच राहतात, महाविकास आघाडी आणि मनसे. मतदारांचा विचार करून उमेदवार कोण, हे पाहिले तर बाळा नांदगावकर आणि अजय चौधरी हे दोघे उभे आहेत. त्यामुळे काही प्रमेय ठरवून मूल्यमापन करावे लागेल. लोकांची कामे होण्यासाठी आपल्याला मतदान करायचे आहे. भाजपा विचारावर चालणारी आहे. त्यामुळे विचारधारा डोळ्या समोर ठेवून निर्णय घ्यायचा आहे, असे शेलार यांनी सांगितले.

‘उबाठा’ गटावर तोफ डागताना आशिष शेलार म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी दगाबाजी केली. महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात मोठा दगाबाज म्हणून उद्धव ठाकरे यांचे नाव घेतले जाईल. शिवडी हा वारकऱ्यांचा विभाग आहे. उद्धवजी आषाढीला पंढरपूरला गेले, पण पांडुरंगाच्या पायाला स्पर्श करणार नाही ही भूमिका घेतली. कोरोनाकाळात जेव्हा लोक देवाचा धावा करीत होते, तेव्हा उद्धव ठाकरे यांनी मंदिरे बंद केली. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजली दिली. त्यावेळी वारी रोखली आणि एकनाथ शिंदे यांनी वारकऱ्यांना मदत केली असता, त्याची चेष्टा केली.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा समलैंगिक म्हणून अपमान करणाऱ्या काँग्रेसला कधी खडे बोल सुनावले नाही. सावरकरांच्या बदनामीला मूक पाठिंबा दिला. ‘पीएफआय’वर बंदी आणली, त्यावर समर्थ करणारी भूमिका मांडली नाही. पालघर साधू हत्याकांड झाले, पण ना खेद ना दु:ख, ना चौकशीला तयार. सीएए ला विरोध केला, काश्मीर मध्ये ३७० हटवले त्याला विरोध. हिंदू समाज सडलेला आहे, असे शरजील उस्‍मानी म्‍हणतो यांना महाराष्‍ट्रात ठाकरे सरकार निर्दोश सोडते. मग आम्ही त्यांचे कसे समर्थन करणार, असा सवाल आशिष शेलार यांनी उपस्थित केला.

Leave a Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *