दि. १३ नोव्हेंबर २०२४
मुंबई: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, थोर स्वातंत्र्यसैनिक, राज्याचे माजी मुख्यमंत्री तसेच माजी राज्यपाल पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित स्व. वसंतदादा पाटील यांच्या जयंतीनिमित्त प्रदेश काँग्रेस कमिटीचे दादर येथील मुख्यालय टिळक भवन येथे पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी वसंतदादांना आदरांजली अर्पण केली.
“वसंतदादा पाटील हे दूरदृष्टीचे नेते होते. आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात त्यांनी महाराष्ट्राला प्रगतीकडे नेणारे अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले. सहकार, शेती, शिक्षण, औद्योगिक प्रगतीमध्ये महाराष्ट्राने आज जी प्रगती केली आहे त्याचा पाया वसंतदादा पाटील यांनी घातला होता. वसंतदादा पाटील यांनी 1977 ते 1985 या कालखंडात दोनवेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषवले आहे. पाणी आडवा, पाणी जिरवा हा मंत्र वसंतदादांनीच दिला. वसंतदादा पाटील यांचे शिक्षण कमी होते पण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शाळा, महाविद्यालये व व्यावसायिक शिक्षणसंस्था उभारण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे”, असे रमेश चेन्नीथला म्हणाले.
यावेळी प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस राजन भोसले, श्रीरंग बर्गे, ब्रिजकिशोर दत्त, सचिव श्रीकृष्ण सांगळे यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.

बीड व परभणीतील घटना सरकार पुरस्कृत, बीड घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा द्या: नाना पटोले 

