कमला हॅरिस यांचा पराभव करून रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकी राष्ट्राध्यक्षाच्या निवडणुकीत विजयी झालेत
अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी बाजी मारली आहे. अध्यक्षपदी पुन्हा आलेले ट्रम्प हे अमेरिकेचे ४७ वे प्रेसिडंट ठरले आहेत. डेमोक्रॅटिक पक्षाच्या कमला हॅरिस यांचा पराभव करत त्यांनी सत्तेची खुर्ची काबीज केली. डोनाल्ड ट्रम्प यांनी २७० हा बहुमताचा आकडा पार करत हा विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी सर्व मतदारांचे आभार मानले आहेत. हा इतिहासातील महान राजकीय क्षण असल्याच ट्रम्प यांनी म्हटलं आहे.
डोनाल्ड ट्रम्प मतदारांना संबोधित करताना म्हणाले की, “आम्ही मतदारांसाठी सर्व काही ठीक करणार आहोत. हा एक राजकीय विजय आहे. असा विजय आपल्या देशाने कधी पाहिलेला नाही. ४७ वा राष्ट्रपती म्हणून प्रत्येक दिवस तुमच्यासाठी लढेन. हा अमेरिकेचा शानदार विजय आहे. अमेरिका पुन्हा एकदा महान राष्ट्र बनेल” असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे.
मस्कच कौतुक करताना ट्रम्प काय म्हणाले?
“लोकांनी अमेरिकेत परत आलं पाहिजे पण कायदेशीररित्या. इथे उपस्थित असलेला प्रत्येकजण खास आणि महान आहे” असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. डोनाल्ड ट्रम्प यांनी एलॉन मस्कच कौतुक केलं. “मस्क कमालीचा माणूस आहे. एलॉन मस्कने जे करुन दाखवलं, ते रशिया करु शकतो का?. चीन करु शकतो का?. कोणी अन्य असं करु शकत नाही” त्यांनी स्पेस एक्सच्या लॉन्चच सुद्धा कौतुक केलं. अमेरिकन बॉर्डर सुरक्षित करण्याचा मुद्दा ट्रम्प यांनी पुन्हा मांडला.
कमला हॅरिस सहा गुणांनी मागे पडल्या
इंडियानाच्या हॅमिल्टन काउंटीमध्ये कमला हॅरिस ट्रम्पपेक्षा जवळपास सहा गुणांनी पिछाडीवर होत्या. २०२० मध्ये बिडेन ट्रम्पपेक्षा सात गुणांनी पुढे होते. मावळते राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांचे मूळ गाव स्क्रँटन असलेले लॅकवान्ना काउंटी येथे कमला हॅरिस कमी फरकाने विजयी होताना दिसल्या.