छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद शाळांचे सौंदर्यीकरण व सुविधांच्या विकासाची कामे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून करण्यासाठी शाळानिहाय सविस्तर नियोजन मुख्याध्यापकांनी तयार करावे व १५ दिवसांत प्रस्ताव सादर करावा,असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहे.
जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी नियोजन सभागृहात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचा जिल्ह्यातील कामांचा आढावा घेतला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, उपजिल्हाधिकारी (रोहयो) उमाकांत पारधी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख तसेच सर्व तहसिलदार, गटविकास अधिकारी उपस्थित होते.
“मनरेगा सारख्या योजनेतून गावातील शाळांचा विकास गावकऱ्यांना करणे सहज शक्य आहे. याबाबत दि.१ डिसेंबर २०२० रोजी नियोजन विभागाने एक परिपत्रक निर्गमित केले होते. त्यानुसार महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळांचा आणि अंगणवाड्यांचा भौतिक विकास करता येईल” असे जिल्हाधिकारी स्वामी यांनी सांगितले आहे.
मुख्याध्यापकांनी आपापल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत भौतिक सुविधांची कामे करण्यासाठी प्राधान्यक्रमवार यादी करुन ती शिक्षणविस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी मार्फत शिक्षणाधिकाऱ्यांकडे पाठवावे. त्यावर तात्काळ अंमलबजावणी करुन येत्या शैक्षणिक वर्षाच्या आधी ही कामे पूर्ण केली जातील असे नियोजन आहे.
या उपक्रमाअंतर्गत १३ प्रकारची कामे करण्यात येणार असून शासन परिपत्रकानुसार शाळांसाठी किचन शेड, शाळा- अंगणवाडीचे रेन वॉटर हार्वेस्टींग, शोषखड्डा, शौचालये, खेळाचे मैदान तयार करणे, संरक्षक भिंत बांधणे, वृक्ष लागवड करणे, आवश्यकतेनुसार शाळा परिसरात पेव्हर ब्लॉक लावणे, काँक्रीट नाली बांधकाम, शाळेकडे येणारे रस्ते गुणवत्तापूर्ण करणे, शालेत बोलरवेल असल्यास त्याचे पुनर्भरण करणे, गांडुळखत प्रकल्प तयार करणे, नाडेप कंपोस्ट तयार करणे अशी कामे मनरेगातून शाळांमध्ये करण्यात येतील अशी माहिती आहे. यासह ७ तालुक्यात मनरेगा मधून जलसंधारणाची कामे (माथा ते पायथा) लक्ष केंद्रीत करुन प्राधान्याने उपाययोजना राबवत करण्यात येणार असल्याचे केंद्रशासनाच्या ग्रामीण विकास मंत्रालयाने दिलेल्या वार्षिक प्रधान सुचनापत्रात निर्देशित केले आहे.


